
पुणे, 16 मार्च (हिं.स.)। ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक 'सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १२ लाख नागरिकांसह संघ स्वयंसेवक- कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तसेच मागील महिन्यात शताब्दीनिमित्ताने झालेल्या गृहसंवाद अभियानात १० लाख ८५ हजारांहून अधिक कुटुंबापर्यंत स्वयंसेवक पोहोचले. त्यांनी कुटुबांतील सदस्यांशी पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली.
संघ आणि समाजातील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रांतभरात तीन हजार तर पुणे महानगरात ४५० सकल हिंदू संमेलनाचे आयोजन होणार आहेत, असेही प्रा. जाधव यांनी सांगितले.
गृहसंवाद अभियानात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात संघदृष्ट्या असलेल्या २४ जिल्ह्यात १० लाख ८५ हजार कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी ४५ हजारांहून अधिक संघ स्वयंसेवक- कार्यकर्ते सहभागी झाले. तर या अभियानाचा भाग असलेल्या पुणे महानगरात ५५ नगरातील ५१२ वस्त्यांमधून ३ लाख ४९ हजार ५३ घरांपर्यंत स्वयंसेवक पोहचले व प्रत्यक्ष संवाद साधला. त्यात १० हजार ८७९ स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशी माहिती जाधव यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान हरियाणा येथे झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून 1438 प्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रतिनिधी सभा आणि संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याची सद्य:स्थिती संबंधाने सोमवारी (१६ मार्च २६) आयोजित पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
संघाचा विस्तार केवळ शाखांपुरता मर्यादित न राहता, तो समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचून समाजकार्यात विरघळून जावा, हा या सकल हिंदू संमेलनांच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे. या संमेलनांच्या माध्यमातून सकल हिंदू समाजातील विविध जाती-जमाती, पंथ आणि घटकांना एकत्र आणून 'समरस आणि संघटित' समाज निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या नियोजनानुसार, एप्रिल अखेरपर्यंत प्रांतातील गाव, वस्ती आणि नगर स्तरावर ही सकल हिंदू संमेलने होणार आहेत. यामध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता आणि सेवा कार्यावर विशेष भर दिला जाणार असून, हजारो स्वयंसेवक आणि नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी होत आहेत.
प्रतिनिधी सभेबद्दल अधिक माहिती देताना प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, संघटन कार्याचा विस्तार, राष्ट्रहितासाठी समाजातील सज्जन शक्तीची अधिक सक्रियता आणि सामाजिक समरसतेच्या संकल्पासह पार पडली. गेल्या वर्षभरात संघटन कार्यात लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे ६ हजारांची भर पडली असून त्या ८८ हजारांहून अधिक झाल्या आहेत, तर शाखांची ठिकाणे ५५ हजारांपेक्षा जास्त झाली आहेत. यासोबतच साप्ताहिक मिलन आणि संघमंडळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. संघटन कार्याचा हा विस्तार केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून अंदमान, अरुणाचल प्रदेश, लेह आणि दुर्गम जनजातीय क्षेत्रांतही संघाच्या शाखा कार्यरत आहेत, हे महत्त्वाचे आहे. संघ शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये हा संघटनात्मक विस्तार स्पष्टपणे दिसून येत आहे.
डॉ. दबडघाव म्हणाले, “संघटनात्मक विस्तारासोबतच संघ समाजात गुणवत्ता वाढविण्यासाठी निरंतर कार्य करत आहे. 'पंच परिवर्तना'च्या माध्यमातून समाजाला सकारात्मक बदलासाठी प्रेरित करणे महत्त्वाचे आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व हा केवळ एक विचार नसून ती एक जीवनशैली आहे आणि त्या माध्यमातून समाजात गुणवत्तेचा विस्तार व्हायला हवा. याच उद्देशाने समाजातील सज्जनशक्तीला एकत्र करणे आणि या विधायक शक्तीचा राष्ट्रहितासाठी उपयोग होणे आवश्यक आहे.’’
एकूण आकडेवारीनुसार, देशात गेल्या वर्षी ५१,७४० ठिकाणी ८३,१२९ शाखा कार्यरत होत्या, त्या आता वाढून ५५,६८३ ठिकाणी ८८,९४९ शाखा झाल्या आहेत. अशा प्रकारे एका वर्षात ३,९४३ नवीन ठिकाणे जोडली गेली असून शाखांच्या संख्येत ५,८२० ने वाढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु