रत्नागिरीत राष्ट्रीय लोक अदालतीत ३ हजार ९१८ प्रकरणांचा निकाल
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गेल्या १४ मार्च रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ९१८ प
रत्नागिरीत राष्ट्रीय लोक अदालतीत ३ हजार ९१८ प्रकरणांचा निकाल


रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गेल्या १४ मार्च रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ९१८ प्रकरणांचा निकाल देण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चालू वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन झाले. या लोकअदालतीला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. लोक अदालतमध्ये जिल्हाभरातून न्यायालयातील ४ हजार १८४ प्रलंबित प्रकरणे आणि १७ हजार ९६३ वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यावेळी एकूण ३ हजार ९१८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. यावेळी एकूण ७ कोटी ५२ लाख २४ हजार ५४५ रुपयांच्या रकमेची तडजोड झाली. जिल्हाभरातून ४ हजार ६८६ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १६ हजार ९५९ वाद दाखलपूर्व प्रकरण या लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. एकूण ४ हजार ७३७ प्रकरणांमध्ये एकूण ८ कोटी ४५ लाख ८२ हजार ७७३ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली.

लोकअदालतीमध्ये वकील व पक्षकार यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधित खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बँका, पतसंस्था, थकीत वीजबिले, टेलिफोनची थकीत बिले इत्यादी प्रकरणांमध्ये तडजोड झाली. हे लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील व कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande