
रायगड, 17 मार्च (हिं.स.) : आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी आदेश दिले आहेत की, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही राज्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह-जिल्हा निबंधक कार्यालये पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. या दिवसांवर दस्त नोंदणीची कामे नियमित सुरु राहण्याचे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मार्चअखेर अनेक नागरिक प्रलंबित खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मालमत्ता खरेदी करण्याचा कल अधिक असतो. या पार्श्वभूमीवर दस्त नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता असते, तसेच मुद्रांक शुल्काचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सह-जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील या दिवसांमध्ये कार्यालयीन देखरेख करणार आहेत. तसेच, ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी अन्य दिवशी असते, त्यांनी त्यापैकी एक दिवस कार्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रायगड-अलिबागचे सह-जिल्हा निबंधक अमित शेडगे यांनी सांगितले की, हा निर्णय मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देईल आणि मार्चअखेर होणारी गर्दी व धावपळ कमी होण्यास मदत होईल.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)