‘शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना आवाहन; १३ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
रायगड, 17 मार्च, (हिं.स.)। डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त येत्या १८ मे रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नाविन्यपूर्ण शेतकऱ्याला “शेतकरी शास्त्रज्ञ” पुरस्काराने
‘शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना आवाहन; १३ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत


रायगड, 17 मार्च, (हिं.स.)। डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त येत्या १८ मे रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नाविन्यपूर्ण शेतकऱ्याला “शेतकरी शास्त्रज्ञ” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी घोषणा कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केली आहे.

या पुरस्कारासाठी पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी केले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेत प्रयोगशील व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना “शेतकरी शास्त्रज्ञ” पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्यानुसार विद्यापीठाने हा उपक्रम राबविला आहे.

वैज्ञानिक पद्धतीने शेती व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे कृषी व संलग्न क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.इच्छुक शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (dbskkv.org) विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी. अर्जासोबत जीवनवृत्त (बायोडेटा), नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती व संबंधित पुरावे जोडणे आवश्यक आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथे अर्ज सादर करावेत. तसेच दोन्ही विभागांतील शेतकऱ्यांनी विस्तार शिक्षण संचालनालय, दापोली येथेही अर्ज पाठवू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२६ असून, प्राप्त अर्जांची तपासणी तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याची निवड करून १८ मे रोजी भव्य समारंभात सन्मानित करण्यात येईल.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande