इंस्टाग्राम डीएममधून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटणार
नवी दिल्ली, 17 मार्च, (हिं.स.)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ८ मे २०२६ पासून डायरेक्ट मेसेज (डीएम)मधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (ई२ईई) फीचर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हे फीचर कंपनीने २०२२ मध्ये सुरू केले ह
End-to-End Encryption Removed Instagram DMs


नवी दिल्ली, 17 मार्च, (हिं.स.)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ८ मे २०२६ पासून डायरेक्ट मेसेज (डीएम)मधील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (ई२ईई) फीचर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हे फीचर कंपनीने २०२२ मध्ये सुरू केले होते. या सुविधेमुळे वापरकर्त्यांमधील चॅट पूर्णपणे सुरक्षित राहायची आणि ती फक्त संबंधित दोन व्यक्तींनाच वाचता येत होती. मात्र आता या सुरक्षेची पातळी बदलणार आहे.

इंस्टाग्रामच्या सपोर्ट पेजनुसार, सध्या ज्यांच्या डीएममध्ये एन्क्रिप्टेड चॅट्स आहेत, त्यांना अॅपमध्ये नोटिफिकेशन मिळणार आहे. कंपनीने वापरकर्त्यांना महत्त्वाचे मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ जतन करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण ८ मेनंतर या एन्क्रिप्टेड चॅट्सचा अॅक्सेस उपलब्ध राहणार नाही. यासाठी काही वापरकर्त्यांना अॅप अपडेट करणे आवश्यक असेल, त्यानंतरच डाउनलोडचा पर्याय दिसेल.

एन्क्रिप्शन प्रणालीमध्ये प्रत्येक डिव्हाइससाठी एक युनिक की तयार केली जात होती. ही की मेसेज लॉक करण्याचे काम करत होती. मेसेज पाठवल्यानंतर तो लगेच एन्क्रिप्ट होत असे आणि फक्त योग्य की असलेल्या डिव्हाइसवरच तो उघडता येत असे. वापरकर्ते एकमेकांच्या कीची तुलना करून चॅटची सुरक्षा तपासू शकत होते. मात्र, जर एखादा मेसेज रिपोर्ट किंवा शेअर केला गेला, तर तो मेटापर्यंत पोहोचू शकत होता.

यामध्ये काही मर्यादा देखील होत्या. चॅटमधील थीम्स आणि काही व्हिज्युअल सेटिंग्ज एन्क्रिप्टेड नव्हत्या. मेटाने २०२२ मध्ये फेसबुक मेसेंजरवर या फीचरची चाचणी घेतली होती आणि नंतर इंस्टाग्रामवर ते उपलब्ध केले. मात्र हे फीचर कधीच डिफॉल्ट नव्हते, तर केवळ काही वापरकर्त्यांसाठी ऑप्शनल स्वरूपात होते.

कंपनीच्या मते, या फीचरचा वापर मर्यादित प्रमाणात होत होता, त्यामुळे ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये एन्क्रिप्शन डिफॉल्ट असताना इंस्टाग्राममध्ये तसे नव्हते. त्यामुळे आता वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. पुढे नवीन प्रायव्हसी फीचर येणार का, याबाबत मेटाने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बदलामुळे वापरकर्त्यांनी वेळेत आवश्यक डेटा सेव करून ठेवणे गरजेचे ठरणार आहे, अन्यथा जुने चॅट्स कायमचे गमावण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande