
मुंबई, 17 मार्च (हिं.स.)। लोकप्रिय मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपने ‘गेस्ट चॅट’ नावाचे नवे फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅप अकाउंट नसलेल्या व्यक्तींशीही सहज चॅट करता येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे व्हॉट्सऍप नाही, पण कधीमधी मेसेज पाठवण्याची गरज भासते, त्यांच्यासाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या फीचरअंतर्गत वापरकर्त्यांना समोरच्या व्यक्तीला ऍप डाउनलोड करण्याची किंवा अकाउंट तयार करण्याची आवश्यकता राहणार नाही. फक्त एक सुरक्षित वेब लिंक शेअर करून थेट चॅट सुरू करता येणार आहे. व्हॉट्सऍपच्या नवीन आणि आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मने सर्वप्रथम या फीचरची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएसच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये काही वापरकर्त्यांना उपलब्ध झाले असून लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गेस्ट चॅट वापरण्यासाठी व्हॉट्सऍप युजरला ‘इनवाइट अ फ्रेंड’ सेक्शनमधून किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधून एक लिंक जनरेट करावी लागते. ही लिंक एसएमएस, ईमेल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करता येते. लिंक उघडल्यानंतर गेस्ट युजर ब्राउझरमध्ये चॅट विंडो उघडू शकतो आणि स्वतःचे नाव टाकून संभाषणात सहभागी होऊ शकतो. अशा चॅटमध्ये ‘गेस्ट’ असा लेबल दिसतो.
सुरक्षेच्या दृष्टीनेही कंपनीने विशेष काळजी घेतली आहे. गेस्ट चॅट्समध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा दिली आहे. म्हणजेच मेसेज फक्त पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच वाचू शकतो. तसेच गरज भासल्यास गेस्ट युजरला ब्लॉक करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
मात्र या फीचरमध्ये काही मर्यादा आहेत. गेस्ट चॅटमध्ये फक्त टेक्स्ट मेसेजिंग करता येते. फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, जीआयएफ किंवा स्टिकर्स शेअर करता येत नाहीत. तसेच व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध नाही. ग्रुप चॅटही तयार करता येत नाही. विशेष म्हणजे, जर १० दिवसांपर्यंत कोणतीही ऍक्टिव्हिटी झाली नाही, तर ही चॅट आपोआप एक्सपायर होते.एकूणच, व्हॉट्सऍपचे हे फीचर वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार असून विशेषतः अशा कुटुंबांसाठी उपयुक्त आहे, जिथे अजूनही काही सदस्य व्हॉट्सऍप वापरत नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule