
बीड, 17 मार्च (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील जिजाऊ, ज्ञानराधा आणि जिजामाता यांसारख्या विविध मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्यांमध्ये हजारो सामान्य ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ठेवीदारांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने एक ठोस कृती आराखडा लागू करावा आणि या प्रकरणातील दोषी संचालक व पदाधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, असे निवेदन त्यांनी दिले आहे. यापूर्वी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सोनवणे यांनी आता मालमत्ता जप्तीचा आणि वसुलीचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची विनंतीही केंद्राकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis