अमरावती : कोणार्क कंपनीला साडेनऊ लाखांचा दंड
अमरावती, 17 मार्च (हिं.स.)।स्वच्छतेच्या करारनाम्यातीलअटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अखेर आज ''मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'' या कंपनीवर तब्बल ९ लाख ६५ हजारांचा दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले. त्यानुसार स्
स्वच्छतेत हयगय : कोणार्क कंपनीला साडेनऊ लाखांचा दंड  महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांची कारवाई


अमरावती, 17 मार्च (हिं.स.)।स्वच्छतेच्या करारनाम्यातीलअटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अखेर आज 'मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' या कंपनीवर तब्बल ९ लाख ६५ हजारांचा दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले. त्यानुसार स्वच्छता विभागाने ही कारवाई केली.महापालिकेमार्फत शहरातील घनकचरा संकलन व वाहतूक तसेच शहरातील दैनंदिन साफसफाईची कामे करण्यासाठी मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीसोबत २८ नोव्हेंबर २०२५ रोजी करारनामा केला होता. करारनाम्यातील भाग 'अ' अंतर्गतची कामे १ डिसेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली; मात्र स्वच्छता विभागामार्फत १ ते १३ मार्चदरम्यान केलेल्या पाहणीच्या वेळी काही त्रुटी निदर्शनास आल्या. त्यानुसार कंपनीच्या काही वाहनांकडे वाहन परवाना, नोंदणी व फिटनेस प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच सदर कागदपत्रे स्वच्छता विभाग कार्यालयात सादर करण्यात आली नाही.याशिवाय करारनाम्यानुसार सर्व कामगारांना गणवेश, ओळखपत्र व इतर आवश्यक साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले नाही. या त्रुटींच्या अनुषंगाने ७ लाख १५ हजार रुपये इतका दंड कंपनीला करण्यात आला. तसेच करारनाम्यानुसार भाग 'ब' अंतर्गत पाचही झोनमधील साफसफाईची कामे १४ मार्चपासून सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्ष पाहणीदरम्यान काही प्रभागांमध्ये कामे सुरू करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार प्रभाग क्र. १ (शेगाव- रहाटगाव), प्रभाग क्र. ६ (विलासनगर मोरबाग) येथेही १४ मार्च रोजी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व साधनसामग्री नव्हते. तसेच प्रभाग क्र. ४ (जमील कॉलनी-लालखडी) या प्रभागामध्ये १४ ते १५ मार्चदरम्यान कामे सुरू केली नव्हती. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व स्वच्छता विभागाकडून याबाबतचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही प्रभागांतील हलगर्जीपणाबद्दल सुमारे २ लाख ५० हजारांचा व अशाप्रकारे एकूण ९ लाख ६५ हजारांचा दंड कोणार्क कंपनीला ठोठावण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande