रत्नागिरी : आशादीपमधील मुलांना रमजाननिमित्त कोकणी समाज ट्रस्ट कडून मदत
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : रमजान महिन्यामध्ये गरजू व्यक्तींना दान देण्याचा रिवाज आहे. त्यानुसार येथील कोकणी समाज ट्रस्टने आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संघातील मुलांसाठी भरघोस मदत केली. ईदचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील विश
आशादीप संस्थेत मदत वाटप


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : रमजान महिन्यामध्ये गरजू व्यक्तींना दान देण्याचा रिवाज आहे. त्यानुसार येथील कोकणी समाज ट्रस्टने आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संघातील मुलांसाठी भरघोस मदत केली.

ईदचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील विशेष मुलांसोबत वाटून घेणे हा प्रामाणिक उद्देश घेऊन आज कोकणी समाज ट्रस्टने आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेतील मुलांना मिष्टान्न भोजन आणि शैक्षणिक संस्थेला रोख रक्कम, तसेच दोन एअर कूलर आणि अन्नधान्य दिले.

कोकणी समाज ट्रस्टच्या या उपक्रमातून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा, त्यांच्या गरजेसाठी हातभार लावण्याचा आणि सणाचा आनंद सर्वांसोबत वाटण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.

रत्नागिरीतील आशादीप मतिमंद मुलांची संस्था मतिमंद व दिव्यांग मुलांच्या निवासी निवारा आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य सेवाभावी संस्था आहे. मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हस्तकला, पणत्या, आकाशकंदील निर्मितीचे प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप रेडकर मुलांसाठी निवासी केंद्र, कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन मुलांच्या संगोपनासाठी व सुविधेसाठी काम करत आहेत.

ही संस्था लोकांच्या मदतीतून मतिमंद मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आणण्याचे काम करत आहे. दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्याविषयी समाजाची संवेदनशीलता व्यक्त करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेला कोकणी समाज ट्रस्टने मदत दिली.

यावेळी कोकणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष सादिक मुकादम, सचिव मोहसीन मापारी, खजिनदार हुसेनमियाँ (बाबू शेठ) मुकादम, ज्येष्ठ सदस्य मुनीर मिठा, लियाकत ठाकूर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande