
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)साठेनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. 23 मार्च रोजी तहसील व पोलिस कार्यालयावर ‘बांगडी फेक’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात महिलांनी 14 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, महिनाभर उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पहाटे 5 ते सकाळी 9 तसेच सायंकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार आहे. तसेच गल्लीबोळांत व घराघरांत जुगाराचे अड्डे सुरू असल्याने परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.
महिनाभरापासून प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने तत्काळ धाडी टाकून हे धंदे बंद करावेत. अन्यथा 23 मार्च रोजी महिलांसह तहसील व पोलिस कार्यालयावर बांगडी फेक आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला जाईल, असा इशारा प्रकाश खंदारे यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड