
स्क्रॅपिंग पाॅलिसीत नवीन वाहन खरेदीवर करसवलत
पुणे, 18 मार्च (हिं.स.) : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या जुन्या वाहनांना दुप्पट कर लावण्यात येणार आहे.अर्थसंकल्पात मांडलेल्या स्क्रॅपिंग पाॅलिसीत नवीन वाहन खरेदीवर करसवलती जाहीर केल्याने जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी घेणे अधिक फायद्याचे ठरणार आहे.नियमानुसार खासगी वाहनांचे १५ वर्षांनंतर नोंदणी नूतनीकरण अथवा स्क्रॅपिंग करावे लागते. व्यावसायिक वाहनांवर ८ वर्षांनंतर पर्यावरण कर लागू होतो आणि १५ वर्षांनंतर फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असते. १५ वर्षांपेक्षा जुनी शासकीय वाहनेही टप्प्याटप्प्याने बाद केली जातात.मात्र, पुणे शहरासह जिल्ह्यात आजही जुन्या तंत्रज्ञानावर आधारित (बीएस-१, २ आणि ३) वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये १५ वर्षावरील वाहन संख्या जवळपास साडेबारा लाख आहे. या जुन्या वाहनांवरील पर्यावरण कर (ग्रीन टॅक्स) आता थेट दुप्पट केल्याने अशा वाहनांचे पासिंग आणि नूतनीकरण अधिक खर्चिक होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु