
- बाेलण्यास संधी मिळत नसल्याने सदस्यांचा गाेंधळ- प्रशासकीय काळातील कामकाजाची निघणार श्वेतपत्रिका , ७४ विषयांना चर्चेविना मंजुरी
नाशिक, 18 मार्च (हिं.स.)।
सभागृहात सदस्यांना बाेलण्याची संधी दिली जात नसल्याच्या मुद्यावरून संतप्त सदस्यांनी महासभेत गाेंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापाैरांनी ७८ विषयांपैकी केवळ चारच विषयांवर चर्चा केली. त्यातही दाेन विषय मागे ठेवण्यात आले असून जादा विषयांसह एकुण ७४ विषयांना विना चर्चा मंजुरी दिली. यात प्रशासकीय काळातील कामकाजाची अार्थिक श्वेत पत्रिका काढण्याचाही ठराव मंजुर करण्यात आला. दरम्यान खेडे विकास निधीच्या मुद्यावर बाेलू दिले जात नसल्याच्या कारणाने सदस्यांनी सभागृहात गाेंधळ घालण्यास सुरूवात केल्याने महापाैरांनी त्वरीत राष्ट्रगीत घेत सभा गुंडाळल्यामुळे संतप्त सदस्यांनी सभागृहातच महापाैरांच्या व्यासपिठासमाेर बसूत ठिय्या आंदाेलन केले.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासन काळात झालेल्या कथित गैरव्यवहारांबाबत नगरसेवकांकडून सातत्याने आरोप करण्यात येत होते. बुधवारी (दि.१८) झालेल्या महासभेतही या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २०२२ मधील दोन महासभांच्या इतिवृत्तांना दुरुस्तीसह मंजुरी देण्यात आली. महापाैर हिमगाैरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत सकाळी १२ वाजता सुरू झालेल्या सभेची सुरुवात प्रश्नोत्तर तासाने झाली. त्यानंतर विषय पत्रिकेवरील मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र मर्यादित विषयांवरच सविस्तर चर्चा झाल्याने अनेक नगरसेवकांना बोलण्याची संधी न मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
- माेकाट श्वानांवरून अधिकारी धारेवर
सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरुन डाॅ. हेमलता पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील सर्वच विभागांमध्ये ४८४८ श्वानांचेच कसे काय निर्बिजीकरण करण्यात आले. प्रत्येक विभागात श्वानांची संख्या सारखीच आहे का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी यात माेठा भ्रष्टाचार असल्याचा आराेप केला. यावर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. तसेच द्वारका परिसरातील पाणीप्रश्नावर ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा पवार यांनी सभागृहात डिजिटल फलक झळकवून लक्ष वेधले. तसेच काँग्रेस गटनेत्याला स्वतंत्र दालन देण्याच्या मागणीसाठी निषेध फलकही प्रदर्शित करण्यात आला.
हे प्रस्ताव घेतले मागे
कुंभमेळ्यासाठी भूसंपादित व अधिग्रहीत जागांचे सर्वेक्षण आणि अनुषंगिक कामांसाठी पात्र सर्व्हेअर सल्लागार नेमण्याच्या सुमारे १९ कोटी ८० लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. तसेच कुंभमेळा सर्वेक्षण कामांच्या दरनिश्चितीबाबतचा प्रस्तावही स्थगित करण्यात आला.
सदस्यांचा सभागृहातच ठिय्या
खेडे विकास निधीबाबत बाेलू न दिल्याने नाराज झालेल्या सदस्यांनी सभागृहात महापाैराच्या पिठासनासमाेर बसून ठिय्या आंदाेलन केले. प्रभाग २६ चे नगरसेवक भागवत आराेटे यांनी महापाैर बाेलून देत नसल्याचा आराेप केला. तर नगरसेविका किरण गामणे यांनी महापालिकेकडे खेडे विकासासाठी निधीच नसल्याने आम्हाला बाेलू दिले जात नसल्याचे म्हटले. नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी जादा विषयात घुसवण्यात आलेल्या वस्त्र धुलाईच्या मुद्यावर आक्षेप घेतला. बिटकाे रूग्णालयात रुग्णांसाठी वस्त्रच नसतानाही वस्त्र धुलाईचा ठेका नेमका काेणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक याेगेश भाेर, मुरलीधर भामरे हे देखील आंदाेलनात सहभागी झाले हाेते.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
खेडे विकास निधी सदर्भात मी प्रभागातील चार पैकी एका सदस्याला बाेलून दिले. या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहेे. तसेच केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री मनाेहरलाल खट्टर यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. खेडे विकाससाठी आपल्याला भरीव निधी मिळणार आहे.
- हिमगाैरी आडके, महापाैर
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV