
जळगाव, 18 मार्च (हिं.स.)स्टॅम्प पेपरसाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिकचे ५०० रुपये घेणे शहरातील जामनेर रोडवरील एका मुद्रांक विक्रेत्याला चांगलेच भोवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जामनेर रोडवरील एका झेरॉक्स-कम-मुद्रांक विक्रेत्याला स्टॅम्प पेपरसाठी जास्तीचे पैसे घेतांना रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या कारवाईमुळे पाचोरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाचोरा शहरातील प्रशांत झेरॉक्स येथे स्टॅम्प पेपर विक्री करताना अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः तातडीची कामे असलेल्या नागरिकांना पर्याय नसल्याने नाईलाजाने अधिक पैसे देऊन स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत होता. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाला पाच हजार रुपयांच्या १० स्टॅम्प पेपरची गरज होती. त्यासाठी तो शहरातील जामनेर रोडवरील प्रशांत झेरॉक्स व मुद्रांक विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडे गेला. यावेळी संबंधित विक्रेत्याने स्टॅम्प पेपर देण्यासाठी ५०० रुपये अतिरिक्तची मागणी केली.या मागणीमुळे संतप्त झालेल्या नागरिकाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने पाचोऱ्यात सापळा रचण्याचा निर्णय घेतला. नियोजनानुसार संबंधित तक्रारदार पुन्हा त्या विक्रेत्याकडे स्टॅम्प पेपर खरेदीसाठी गेला. यावेळीही विक्रेत्याने पाच हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी साडेपाच हजार रुपये देण्याची मागणी केली. ठरल्याप्रमाणे संकेत मिळताच एसीबीच्या पथकाने तत्काळ धाड टाकून संबंधित विक्रेत्याला पकडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर