
पुणे, 18 मार्च, (हिं.स.) - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) वर्तुळाकार रस्त्याची (रिंग रोड) आखणी करताना त्यांच्याच बांधकाम खात्याने दिलेल्या परवानगीचा विसर पडला आहे. बांधकाम परवानगी दिलेल्या जागेवरच रिंग रोडचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. जोते तपासणी (प्लिंथ तपासणी), पूर्णत्वाचा दाखला किंवा हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर), चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यासाठी अर्ज केल्यावर नागरिकांना ‘तुमची इमारत रिंग रोडमध्ये बाधित होत आहे,’ असा खुलासा ‘पीएमआरडीए’ने केला. यामुळे शेतकरी, छोटे भूखंडधारक हवालदिल झाले आहेत.
‘पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला; तो ६५ मीटर रुंदीचा आहे. यानुसार रिंग रोड जाणाऱ्या भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीचे नकाशे आखून दिले; ते मंजूर झाले. ‘पीएमआरडीए’च्या अभियांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाशी चर्चा न करता रिंग रोडचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे पाठविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु