गारपीट बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा-आमदार अमित देशमुख
लातूर, 18 मार्च (हिं.स.)। लातूर, धाराशिव जिल्ह्यांसह मराठवाड्यातील अनेक भागांत काल दुपारी आणि रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचेही नुकसा
गारपीट


लातूर, 18 मार्च (हिं.स.)।

लातूर, धाराशिव जिल्ह्यांसह मराठवाड्यातील अनेक भागांत काल दुपारी आणि रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

२२ फेब्रुवारी २०२६ रोजीही लातूर जिल्ह्यात अवकाळी गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. त्या संकटातून सावरत असतानाच काल पुन्हा झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, करडई ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच आंबा व द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २१ मार्चदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande