
अकोला, 19 मार्च (हिं.स.) शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास डाबकी रोड परिसरातील एका चहा टपरीवर काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. “तू काय पाहत आहेस माझ्याकडे?” या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला.या वादादरम्यान तीन युवकांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केवळ सहा तासांत तीन आरोपींना दर्यापूर येथून अटक केली. आरोपी मध्य प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे