
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने आगवे (ता. चिपळूण) येथे अवैध बंदूक बाळणाऱ्या एकाला अटक केली आहे.
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यांना प्रतिबंध घालण्यासाठी व कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक सावर्डे पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्त घालत असताना आगवे येथे महेश जाधव आपल्या घराच्या मागील बाजूस अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे या पथकाने सापळा रचून पाहणी केली असता घराच्या मागील बाजूस गुरांच्या गोठ्याजवळील लाकडी खोपट्यात एक व्यक्ती बंदुकीची साफसफाई करताना आढळून आली. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय 35, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे सांगितले. पाहिणीदरम्यान त्याच्याकडे असलेली बंदूक सिंगल बॅरल काडतुसाची असल्याचे निदर्शनास आले. शस्त्र बाळगण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.
पथकाने एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक ९ जिवंत काडतुसे असा एकूण ७० हजार ९०० रुपये किमती मुद्देमाल जप्त केला. तसेच महेश जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी