
रायगड, 20 मार्च (हिं.स.) : पाली पोलीस ठाणे हद्दीत पाली-खोपोली मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक मदत न करता फरार झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी (रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, काल्हेर, ठाणे) हे त्यांच्या होंडा शाईन (MH-04-LS-2559) या दुचाकीवर जखमी साक्षीदारासोबत होळी सणासाठी खुरावले येथे जात होते. पाली-खोपोली रोडवरील मौजे व-हाड गावाच्या हद्दीत आरोपी (रा. चिवे, ता. सुधागड) यांनी त्यांच्या अॅक्सेस दुचाकी (MH-04-MX-8996) वर अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
धडकेत फिर्यादीच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दोघांनाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या. मात्र, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
पाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून गु.र. नं. 26/2026 अंतर्गत मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 134, 128 आणि भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 281, 125(a), 125(b) अन्वये कारवाई केली आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार भोईर करीत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)