
नाशिक, 21 मार्च, (हिं.स.)। अनेकांनी मला अंकशास्त्र ज्योतिषी खरात यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता परंतु मी मात्र काही गेलो नाही अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
नाशिक मध्ये रमजान ईदच्या निमित्याने आलेले राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे असं माझे मत आहे. काही चांगले साधू देखील असून,ते चांगले काम करत आहेत. अशोक खरातकडे फार मोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर पुण्याच्या असून त्यांना काय माहिती? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेले असेल. पण राजकीय क्षेत्रात काम करणार्यांनी काही बंधने पाळले पाहिजे. काही सीमा आखून ठेवल्या पाहिजे. कारण आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आम्ही पुढारी आहोत. मंत्री जातात मग आपण जायला काय हरकत आहे? पोलीस याबाबत चौकशी करत असून, कारवाई होईल” असे भुजबळ यांनी म्हटले.
पुढे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, “राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला. मात्र त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना भुजबळ म्हणाले की, “कॅप्टन अशोक खरातकडे जाण्यासाठी आमचे लोक देखील सांगत होते. परंतु, मी काही गेलो नाही. त्यामुळे त्याच्याबाबत मला काही अधिक माहिती नाही”, असे त्यांनी म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV