
विविध तज्ज्ञांनी केले सहभागींना मार्गदर्शन, रविवारी होणार समारोप नाशिक, 21 मार्च (हिं.स.)। टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिक आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (वेस्ट झोन), गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि धुळे डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'गोदा कर मंथन २०२६' या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कर परिषदेचे आयोजन केले आहे. शनिवारी (२१ मार्च) गंगापूर रोडवरील येथे या परीषदेला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवसभरात विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. रविवारी (२२ मार्च) परीषदेचा समारोप होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास जीएसटी अपिलेट ट्रिब्युनल सदस्य . बी. व्ही. बोराडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमात ते म्हणाले, आजचा कार्यक्रम टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने त्यांच्या सदस्यांना शिक्षित करण्यासाठी आयोजित केला आहे. प्रॅक्टिशनर्सची भूमिका कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. सेल्स टॅक्स विभागात ३० वर्षे घालवल्यानंतर मला असे वाटते की, सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर आणि निर्णय घेणारे अधिकारी हे दोन वेगळे पक्ष नाहीत. ते एकमेकांचे स्पर्धक किंवा शत्रू नाहीत. न्यायालयाच्या कोणत्याही निकालाचा संदर्भ घेतला तर आपल्याला 'अर्जदार' आणि 'प्रतिवादी' असे दोन पक्ष दिसतात, पण ते स्पर्धक असल्याचे कुठेही नमूद केलेले नसते, असे सांगत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. सुनिल देशमुख म्हणाले, 'गोदा कर मंथन २०२६' या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय कर परिषदेचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर बोलताना मला अत्यंत आनंद, अभिमान आणि जबाबदारीची जाणीव एकाच वेळी होत आहे. ही केवळ एक परिषद नाही, तर आपल्या व्यवसायातील ज्ञान, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उभारलेले एक सशक्त व्यासपीठ आहे. कर कायदा हा केवळ नियमांचा संच नसून देशाच्या आर्थिक शिस्तीचा आणि पारदर्शकतेचा पाया आहे. कर कायदे वेगाने बदलत आहेत, त्याची व्याप्ती आणि गुंतागुंत वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे ठरत नाही, तर अनुभव आणि विचारशक्ती, योग्य विश्लेषण करण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण केवळ टॅक्स रिटर्न भरणारे नसून शासन आणि करदाता यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहोत.
टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन नाशिक चे अध्यक्ष नितीन फिरोदिया म्हणाले की, या उपक्रम आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आभार मानतो. या माध्यमातून जीएसटी क्षेत्रातील दिग्गज मान्यवर व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा फायदा सहभागींना होणार आहे. व पुढे ते त्यांच्या ग्राहकांना यथोचित मार्गदर्शन करु शकतील. या परिषदेसाठी भारतातून १५० कर सल्लागार, ऍडव्होकेट व सीए यांची उपस्थिती होती. पार्थ बढेका म्हणाले, एनआरआरसी व राष्ट्रीय परीषदेसाठी सर्वांचे स्वागत करतो. अतिशय उत्कृष्ट आयोजन केले आहे. अशा स्वरुपाचे कार्यक्रम आयोजनात मोठी परीश्रम लागत असतात. ही धुरा नाशिक शाखेने सांभाळतांना यशस्वी आयोजन केले. सहभागींना या उपक्रमाचा त्यांच्या व्यावसायिक जीवनात फायदा होईल. ॲकॅडमीक सत्रांचा त्यांना निश्चित लाभ होईल. अक्षय मोदी म्हणाले, नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असताना, अशा स्वरुपाच्या परीषदेचा फायदा प्रॅक्टिशनर्स यांना होणार आहे. जीएसटी कायद्यात सातत्याने सुधारणा होत असून याबाबतची माहिती होण्यासाठी मदत होईल. याअनुषंगाने विषयांची निवड करण्यात आली आहे. पार्क साईडचे मर्झियान पटेल म्हणाले, बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले पार्क साईड २५ वर्षाहून अधिक काळापासून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पाडत आहे. या उपक्रमाशी जोडले जाताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे.
या कार्यक्रमास ए आय एफ टी पी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष समीर जानी, राष्ट्रीय खजिनदार सिद्धेश्वर येमाली, नॅशनल वेस्ट उपाध्यक्ष भरत सचदेव, वेस्ट झोनचे अध्यक्ष अक्षय मोदी, उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, नॅशनल कौन्सिल मेंबर विनायक पाटकर, सचिन गांधी, 'नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन'चे विद्यमान अध्यक्ष नितीन फिरोदिया व सर्व माजी अध्यक्ष, एमटीपीए चे अध्यक्ष अनुरुद्र चव्हाण, धुळे टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वराडे व आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश विसपुते, संदीप गाढवे मनोज धाडीवाल, . रविंद्र चोपडा, अॅड. अनिकेत कुलकर्णी, सचिन येवलेकर, प्रशांत उशीर, . समाधान अपसुंदे, सौ. अर्चना चंद्रात्रे, श्री. श्रीकांत चंद्रात्रेअॅड. योगेश क्षत्रिय, श्री. वैभव सारंगधर, श्री. किरण नेरकर . राजाराम चव्हाण, श्री. मनोज कल्पवृक्ष, आदींनी परिश्रम घेतले. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV