
मुंबई, 21 मार्च (हिं.स.) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारला भोंदूगीरीबद्दल कमालीचे प्रेम होते. याच भोंदूबाबाने तत्कालिन मुख्यमंत्र्यांना वश करून त्यांच्यासाठी विशेष सरकारी अधिसूचना जारी करण्यास भाग पाडले होते. मविआ सरकारने या भोंदूबाबासाठी पायघड्या घातल्या होत्या. याबाबत संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कार्यकाळात भोंदूगीरीला, भोंदूबाबांना थारा नाही. खरातचे कारनामे समोर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सरकारने लागलीच कठोर कारवाई करत भोंदूबाबाला अटक केली, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला, असे श्री. बन यांनी नमूद केले.
यावेळी श्री. बन म्हणाले की, सत्तेसाठी, मतांच्या राजकारणासाठी मुस्लीमांच्या अनुनयात रममाण राऊत आणि उबाठा गटाचे हिंदुत्व बेगडी आहे. ज्यांनी खुर्चीसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडले त्या राऊतांना हिंदुत्वाबद्दल लटके प्रेम दाखवण्याचा अधिकार नाही. त्याचवेळी हिंदुत्वाच्या नावावर कोणी बाजार मांडत असेल तर त्याची गय केली जाणार नाही हा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने दिला आहे.
भाजपा महायुती सरकार जनतेच्या आशीर्वादाने निवडून दिलेले सरकार आहे. खुर्चीसाठी जनमताचा अनादर करत, पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करत आलेले सरकार नाही असा खोचक टोमणा मारत श्री. बन म्हणाले की हे कोणा भोंदूबाबाच्या काळ्या जादूने पडेल इतके तकलादू सरकार नाही.
*आधी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या मग .....*
भोंदूबाबासोबत महायुती सरकारमधील मंत्र्यांचे फोटो आहेत म्हणून त्यांचे राजीनामे घ्यायला हवेत असे उच्चरवात बोलणा-या राऊतांना आव्हान देत श्री. बन म्हणाले की या न्यायाने तर राऊतांनी आणि उद्धव ठाकरे यांनी हिंमत दाखवून मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घ्यायला हवा आणि मग सत्ताधारी मंत्र्यांबद्दल बोलावे. कारण श्री. नार्वेकर यांचे भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत. नाशिकचे संपर्क मंत्री असताना राऊतांसोबत ही भोंदूबाबाचे फोटो समोर येतील तेव्हा राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का असा खोचक सवाल श्री. बन यांनी केला. कोणा मंत्र्यासोबत या भोंदूबाबाचे फोटो आहेत म्हणून तो मंत्री दोषी असा बादरायण संबंध जोडणे राऊतांनी त्वरित बंद करावे असेही त्यांनी खडसावले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच खऱ्या अर्थाने धुळीस मिळवले. स्वा.सावरकरांचा वारंवार अपमान करणा-या राहुल गांधींसोबत खुर्चीसाठी मांडीला मांडी लावून बसणा-या उद्धव ठाकरे, राऊत यांनी त्यांचे सावरकरप्रेम दाखवून दिले आहे अशी टीका श्री. बन यांनी केली. स्वा.सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही विज्ञाननिष्ठ असल्याने महायुती सरकारकडून भोंदू बाबांवर कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांना सावरकरांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही असेही त्यांनी खडसावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर