सायन कोळीवाड्यातील एसआरए प्रकल्पात वेळकाढूपणा, सरकारने हस्तक्षेप करावा - जोसेफ शांतीमानव
मुंबई, २१ मार्च (हिं.स.) : येथील सायन कोळीवाडा परिसरात निसर्ग (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्प साधारणतः १७ वर्षे उलटूनही अद्याप अपूर्ण आहे. या प्रकल्पाचे काम सध्या हलकारा बिल्डर्सद्वारे सुरू असले तरी नियमबाह्य पद्धतीने आणि वेळकाढूपणे काम चा
शांतीमानव


मुंबई, २१ मार्च (हिं.स.) : येथील सायन कोळीवाडा परिसरात निसर्ग (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्प साधारणतः १७ वर्षे उलटूनही अद्याप अपूर्ण आहे. या प्रकल्पाचे काम सध्या हलकारा बिल्डर्सद्वारे सुरू असले तरी नियमबाह्य पद्धतीने आणि वेळकाढूपणे काम चालू आहे. यात सुमारे ३५० हून अधिक कुटुंबांना हक्काच्या घरांची प्रतीक्षा आहे, इमारत तयार असूनही ताबा मिळालेला नाही‌. या विरोधात प्रशासकीय स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोसेफ शांतीमानव आणि मोहन गुप्ता यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत घेत केली आहे.

अधिक माहिती देताना जोसेफ शांतीमानव यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक आर्थिक व प्रशासकीय बाबी प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, विकासकांकडे सुमारे ११.२५ कोटी रुपयांचे थकीत भाडे, ५.७५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर आणि सुमारे २ कोटी रुपयांचा कॉर्पस फंड प्रलंबित आहे. रहिवाशांना सध्या दरमहा केवळ १२ हजार रुपये भाडे दिले जात असून ते अत्यंत अपुरे आहेत. तसेच प्रकल्पातील विक्रीसाठी असलेल्या सर्व ७७ सदनिका आधीच विकण्यात आल्याचा आणि संपूर्ण एफएसआय व टीडीआर देखील वापरून संपवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे विक्री सदनिकांचे खरेदीदारही अडचणीत सापडल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात पुढे न्यायालयीन पातळीवर दाद मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, सरकारने ११.२५ कोटी रुपयांचे थकीत भाडे अदा करावे आणि रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) देऊन न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande