
लातूर, 21 मार्च (हिं.स.) : काही करण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही, हे अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील पल्लवी जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच झालेल्या नांदेड पोलीस भरतीमध्ये पल्लवीने एसईबीसी प्रवर्गातुन १२९ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाऊन उत्तुंग भरारी घेतली असून, गावची पहिली महिला पोलीस होण्याचा मान तिने पटकावला आहे.
हलाखीच्या परिस्थितीवर मात
पल्लवीचे कुटुंब अत्यंत सर्वसाधारण असून तिच्या वडिलांकडे जेमतेम शेती आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत असतानाही पल्लवीने आपले ध्येय ढळू दिले नाही. शिक्षणासाठी आणि प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव असतानाही तिने केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर हे यश संपादन केले असुन महागड्या क्लासचा आधार न घेता केवळ स्वतःच्या कष्टावर हे यश खेचून आणले आहे. अंगात खाकी वर्दी चढवून जेव्हा पल्लवी गावात येईल, तेव्हा तो क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा असणार आहे.
यशाचा टप्पा: १२९ गुणांची कमाई
नांदेड पोलीस भरतीमध्ये अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पल्लवीने आपल्या शारीरिक कौशल्याचा आणि लेखी परीक्षेचा कस लावला. एसईबीसी प्रवर्गातुन तिने एकूण १२९ गुण प्राप्त करत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाऊन गुणवत्ता यादीत आपले स्थान पक्के केले. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण अहमदपूर तालुक्याचा मान वाढला आहे.
माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांच्या कष्टाला देते. शेतात राबून त्यांनी मला शिकवले, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्न मला पूर्ण करायचे होते. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द हरू नये, कष्ट केल्यास यश नक्की मिळते.
— पल्लवी जाधव (नवनियुक्त पोलीस)
गावात आनंदाचे वातावरण
सुनेगाव शेंद्री गावाला पहिली महिला पोलीस मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावातील एका शेतकरी कन्येने पोलीस गणवेश परिधान करून गावचे नाव लौकिक केल्याबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पल्लवीचा हा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis