
नाशिक, 21 मार्च (हिं.स.)। कॅप्टन अशोक थोरात प्रकरणांमध्ये आता पोलिसांनी चौकशीची गती वाढविली असून शनिवारी दुपारी नाशिकच्या पोलीस क्लब मध्ये विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी काही तास खरात यांची चौकशी केली त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार अजून काहीजणांना चौकशीसाठी बोलविण्याची शक्यता आहे. आता पोलीस पथक खरात यांचे राजकीय आणि व्यवसायिक लागेबांधे शोधत आहे.
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते . मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सध्या नाशिकमध्ये तपास करत असून त्याची पोलीस कोठडी 24 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचे काम या पथकडून सुरू असून शनिवारी देखील या पथकाने नाशिकच्या पोलीस क्लब मध्ये खरात यांची काही तास चौकशी केली त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार अजून अनेकांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.सध्या खरात याचे व्यवसायिक व राजकीय धागेदरोबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे यात या अंतर्गत तपासात नव्या घडामोडी समोर येत असून, दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची विशेष तपास पथक कडून कसून चौकशी करण्यात आली आहे. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेषतः सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत लोंढे सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे.
या पथकाने दीपक लोंढे यांची सखोल चौकशी करत विविध आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांची माहिती गोळा केली आहे. या चौकशीतून मिळणाऱ्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिस अशोक खरातच्या संभाव्य राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान, ज्याचा अध्यक्ष अशोक खरात होता, या संस्थेसाठी दारणा धरणातून 0.0039 दश लक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. 31 जुलै 2020 रोजीचा हा शासन निर्णय असून, गोदावरी उजवा तट कालव्यातून पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली होती. हा निर्णय ठाकरे सरकारच्या काळात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात याचा मंत्रालयातील अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही दबदबा होता का? असा सवाल उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV