अमेरिका आता लष्करी कारवाया कमी करणार,मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन, 21 मार्च (हिं.स.)मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. संघर्षाला चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबाबत एक मोठा
डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन, 21 मार्च (हिं.स.)मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. संघर्षाला चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबाबत एक मोठा दावा केला आहे. 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सूचित केले आहे की, अमेरिका मध्य पूर्वेतील आपली लष्करी उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या अगदी जवळ आहे. त्याच वेळी, ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली.'ट्रुथ सोशल'वरील आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिका आपली लष्करी उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या अगदी जवळ आहे आणि आता मध्य पूर्वेतील आपल्या मोठ्या लष्करी कारवाया हळूहळू कमी करण्याचा विचार करत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रुथ सोशलवर सांगितली पाच उद्दिष्ट्ये:

इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित सर्वकाही पूर्णपणे नष्ट करणे.

इराणचा संरक्षण औद्योगिक पाया नष्ट करणे.

इराणचे नौदल आणि हवाई दल, तसेच विमानविरोधी शस्त्रे नष्ट करणे.

इराणला आण्विक क्षमता प्राप्त करण्यापासून रोखणे आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ शकेल अशा स्थितीत राहणे.

इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतरांसह आपल्या मध्य-पूर्वेतील मित्र राष्ट्रांचे सर्वोच्च स्तरावर संरक्षण करणे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही सांगितले की, अमेरिका आपले मध्य-पूर्वेतील मित्रराष्ट्र - इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतर देशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राहील. ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही एक कडक संदेश दिला. त्यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण सागरी मार्गाची सुरक्षा आणि निगराणी, तो वापरणाऱ्या देशांनीच सांभाळली पाहिजे, कारण अमेरिका स्वतः हा मार्ग वापरत नाही.

ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, गरज पडल्यास अमेरिका या देशांना मदत करेल, पण एकदा इराणचा धोका संपुष्टात आला की याची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्या मते, या देशांसाठी ही एक साधी लष्करी कारवाई असेल. ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की, अमेरिका मध्य-पूर्वेतील दीर्घकाळ चाललेल्या लष्करी संघर्षातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक पावले उचलत असावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande