अहंकाराची लंका जाळण्यासाठी श्रद्धेचा 'सेतू' हवा : डॉ. भूषण फडके
अकोला, 22 मार्च (हिं.स.)। ''जेव्हा आपण स्वतःला ''मी'' म्हणून मोठे करतो, तेव्हा संकटाचे तोंड सुरसेसारखे मोठे होते. पण जेव्हा आपण ''मी''पणाचा त्याग करून लघुरूप (नम्र) होतो, तेव्हा कोणत्याही संकटाच्या मुखातून सुरक्षित बाहेर पडू शकतो, असे प्रति
Photo


अकोला, 22 मार्च (हिं.स.)। 'जेव्हा आपण स्वतःला 'मी' म्हणून मोठे करतो, तेव्हा संकटाचे तोंड सुरसेसारखे मोठे होते. पण जेव्हा आपण 'मी'पणाचा त्याग करून लघुरूप (नम्र) होतो, तेव्हा कोणत्याही संकटाच्या मुखातून सुरक्षित बाहेर पडू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केले. अकोला येथे निलेश देव मित्रमंडळ आयोजित आयोजित 'संगीतमय श्रीरामकथा' महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात ते 'सुंदरकांड' आणि 'युद्धकांडा'तील व्यवस्थापन सूत्रांवर निरूपण करत होते.

आजच्या कथेत हनुमानाचे समुद्र उल्लंघन , सीता शोध , रावण-हनुमान संवाद , लंकादहन , बिभीषण शरणागती , सेतुबंधन आणि अंगद शिष्टाई या प्रसंगांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

यावर्षीच्या डॉ. फडके यांनी हनुमंताच्या कार्याला शेगावचे संत गजानन महाराज यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीची जोड दिली. भक्ती, शक्ती आणि चातुर्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे वीर हनुमान, तर शक्ती आणि अहंकार यांचे प्रतीक म्हणजे रावण. हनुमंताने समुद्र ओलांडताना मैनाक पर्वताचा आदर केला (स्पर्श केला), पण ते तिथे विश्रांतीसाठी थांबले नाहीत. गजानन महाराज नेहमी म्हणायचे, उपाधीत अडकू नका. संसारात मान-सन्मान मिळतील, पण त्यात न अडकता आपले 'ध्येय' (रामकार्य) विसरू नये, हाच महाराजांचा आणि हनुमंताचा संदेश आहे.

हनुमंतासमोर जेव्हा सुरसेसारखी संकटे आली, तेव्हा त्यांनी बुद्धीचा वापर केला. डॉ. फडके म्हणाले की, महाराजांचा 'गण गण गणात बोते' हा मंत्र शिकवतो की प्रत्येक जीवात तोच परब्रह्म आहे. समोरचा आदरातिथ्य करत असेल तर नम्र व्हा, अहंकारी असेल तर सूक्ष्म व्हा आणि ध्येयाच्या आड येत असेल (सिंहिका राक्षसीप्रमाणे), तर तिथे धर्माचा प्रहार करायला मागे हटू नका.

लंकादहनाचा प्रसंग विशद करताना डॉ. फडके यांनी सांगितले की, लंका म्हणजे मनातील नकारात्मकता—भीती, राग आणि अहंकार. हनुमान हे 'Inner Power Activation' चे प्रतीक आहेत. हनुमंताने रावणाच्या दरबारात दाखवलेले बुद्धीचातुर्य हे विलक्षण होते. रावणाने जेव्हा शेपटी पेटवली, तेव्हा हनुमानाने त्याच अग्नीने सोन्याची लंका भस्मसात केली. डॉ. फडके यांनी स्पष्ट केले की, आपल्या मनातील ताणतणाव आणि अहंकाराची 'लंका' जाळण्यासाठी हनुमंतासारखी जागरूकता आणि गजानन महाराजांसारखी 'साक्षीवृत्ती' अंगी बाणवणे काळाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक लंका आहे, पण आपल्या आतही एक हनुमान आहे जो जागरूकतेने त्या लंकेला जाळू शकतो.

सेतुबंधनाच्या प्रसंगावर बोलताना ते म्हणाले की, पाच दिवसांत १०० योजने लांब सेतू उभा राहणे असामान्य आहे, प्रभू रामांनी सामान्य वानरांकडून असामान्य कार्ये करून घेतली, हे नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.. गजानन महाराज आपल्याला शिकवतात, तुम्ही फक्त निमित्त व्हा, कार्य करणारा तो वर बसलेला राम आहे. जसा नलाचा हात आणि रामाचे नाव लागून सेतू बांधला गेला, तसेच महाराजांचा आशीर्वाद आणि आपले कष्ट एकत्र आले की संसाराचा अथांग सागर ओलांडणे कठीण राहत नाही.

याप्रसंगी विविध भक्तीगीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. देवाशिष फडके याने सेतुबंध रे सागरी, हे राम हे राम तर निखील देशमुख यांनी पेटवी लंका हनुमंत, विश्वाचा विश्राम रे, सुग्रीव हे साहस असले, वैशाली फडके यांनी, गजाननच्या चरणी जुळवू या आपुले नाते, श्रीराम गजर तर सुमंत तरालकर यांनी अविरत ओठी हि गीते सदर केली. गण गणात बोते या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. हार्दिक दुबे ,आणि विग्नेश बोकसे यांनी साथ सांगत केली. कथेला भाविकांची अलोट गर्दी लाभली असून, निलेश देव मित्रमंडळाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे रसिकांनी भक्तिरसाचा आनंद घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande