

अकोला, 22 मार्च (हिं.स.)। हिवरखेड शहरातील अकोट सोनाळा राज्यमार्गावरील रामकृष्ण वेट ब्रिज जवळ एका ट्रकवर असलेल्या युवकाचा महावितरणच्या हाय टेन्शन लाईनला स्पर्श झाल्यामुळे निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर कैलास गोमासे या तरुण कामगाराचा विद्युत तारांच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण हिवरखेड परिसरात संतापाची लाट उसळली. घटना घडल्यानंतर ज्ञानेश्वर चा मृतदेह तेल्हारा येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आला.
आज 22 मार्च रोजी सकाळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर चा मृतदेह तेल्हारा येथून थेट अकोट सोनाळा राज्य मार्गावरील रामकृष्ण वेट ब्रिज जवळ रुग्णवाहिकेत ठेवून ठिय्या मांडला. यावेळी शेकडो संतप्त नागरिकांचा जमाव तेथे जमला होता व त्यांनी मृतकाला न्याय देण्याची मागणी करीत घोषणाबाजी केली.
दरम्यान ज्ञानेश्वर हा आयशर ट्रकवर आपले ताडपत्री व्यवस्थित करीत होता. मात्र, तिथेच लोबंलेल्या महावितरणच्या जीवघेण्या हाय टेन्शन च्या विद्युत तारांचा त्याला स्पर्श झाला. हा धक्का इतका भीषण होता की ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा लोबंलेल्या असतानाही महावितरणने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा जमावाने घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
त्यानंतर अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी हिवरखेड येथे भेट दिली. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस ताफा बोलविण्यात आला होता.
'प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,' असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
त्यानंतर गावातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, इत्यादींनी मध्यस्थी करून कुटुंबीयांची समजूत घालून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर शेवटी ज्ञानेश्वर वर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. ज्ञानेश्वर हा अत्यंत सुस्वाभावी आणि सर्वांचा लाडका असल्याने त्याच्या अंतिम यात्रेत शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे.
ग्रामस्थांचा रोष पाहता महावितरणच्या विद्युतदारांना स्पर्श घालून दुःखद मृत्यू झाल्यामुळे मृतक ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत मिळालीच पाहिजे व मन महावितरणच्या संबंधित दोषी विरुद्ध आणि जे कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्ञानेश्वर चा मृत्यूस कारणीभूत असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असा जनतेची एकमुखी मागणी दिसून आली.
*चिमुकली मोक्षदाचे पितृछत्र हरविले*
ज्ञानेश्वर हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता. संपूर्ण कुटुंबात तो एकटा कमावता व्यक्ती असल्याने त्याच्या जाण्याने गोमासे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्यावर अवलंबून त्याचे वृद्ध आजी आजोबा, आई, वडील, पत्नी दोन वर्षीय चिमुकली मुलगी मोक्षदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच पितृछत्र हरविल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर कुटुंबाला मदत न मिळाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी 'केवळ आश्वासन नको, तर ठोस आर्थिक मदत हवी,' अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे