
अकोला, 22 मार्च (हिं.स.)।
गुरु श्री तेग बहादूर साहेब यांच्या अतुलनीय शौर्य, संघर्ष, बलिदानाचा जाज्वल्य इतिहास कलावंतांनी नाट्य सादरीकरणातून जागा केला. श्री गुरु तेगबहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हिंद-दी -चादर' नाट्यप्रयोग अकोल्यातील प्रमिलाताई ओक नाट्यगृह येथे झाला.
या नाट्यप्रयोगाद्वारे श्री गुरु तेगबहादूर साहेब यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा पट रंगभूमीवर साकारण्यात आला. त्याद्वारे अकोलेकर रसिकांना शौर्य, पराक्रम, संघर्ष व बलिदानाची कथा अनुभवायला मिळाली.
प्रारंभी दीपप्रज्वलन व गुरु श्री तेग बहादुर साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार, प्रसिद्ध नाट्यलेखक अरविंद विश्वनाथ, मधु जाधव, गुरुमितसिंग गोसल, सुरजीतसिंग अकाली यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रीगुरु तेग बहादुर जी यांनी धर्म स्वातंत्र्य मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे यासाठी महासंचालनालयाच्या वतीने ठिकठिकाणी नाट्यप्रयोग होत आहेत.
या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे. महेश कोकाटे (काझी ) अरुण पालव ( शहाजी ) गौरी शेवडे ( प्राध्यापक), डॉ.राजू पाटोदकर( औरंगजेब ), विशाल मोरे, मनोज नटे,सनी सिंग,गायक तेज गिल,सचिन नवरे आणि शिवाजी रेडेकर यांनी आपल्या समर्थ अभिनय, कला सादरीकरणातून इतिहास जिवंत केला. एकूण 60 कलाकार, तंत्रज्ञांच्या सहभागातून हे महानाट्य साकारण्यात आले.
ऐतिहासिक काळाचे दर्शन घडवणारे नेपथ्य, दमदार अभिनय व सादरीकरण प्रभावी होते. प्रयोगाला अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे