मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलीस दलाचा उत्साह: अहमदपूर आणि किनगाव संघांनी विभागले जेतेपद!
लातूर, 22 मार्च (हिं.स.)। पोलीस दलातील कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात कमालीची रंगत पाहायला मिळाली. अहमदपूर पोलीस संघ आणि किनगाव पोलीस संघ यांच्यात झा
मैत्रीपूर्ण क्रिकेट


लातूर, 22 मार्च (हिं.स.)।

पोलीस दलातील कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात कमालीची रंगत पाहायला मिळाली. अहमदपूर पोलीस संघ आणि किनगाव पोलीस संघ यांच्यात झालेल्या या दोन सामन्यांच्या लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला. या सामन्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी दोन्ही संघांकडून खेळून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

आठ षटकांच्या पहिल्या सामन्यात किनगाव पोलीस संघाने बाजी मारली. अहमदपूर पोलीस संघाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी केले. अहमदपूर संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना किनगावचे कप्तान किशोर सोनवणे, सपोनि माणिक डोके, पोऊनि सत्यजित तोंडारे आणि सहकाऱ्यांनी जोरदार कामगिरी केली. किनगाव संघाने ५६ धावांचे लक्ष्य २ गडी राखून आणि २ चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले.

किनगावचा शिवाजी गोरे या सामन्याचा मानकरी ठरला, त्याला ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माजी जि.प. सदस्य किशोर मुंढे व जि.प. सदस्य भागवत गुट्टे यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक दिले.

पाच षटकांच्या दुसऱ्या सामन्यात अहमदपूर पोलीस संघाने जोरदार पुनरागमन केले. या सामन्यात अहमदपूरच्या संघाने किनगाववर मात करत विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरलेले पोलीस उपनिरिक्षक आनंद श्रीमंगल यांना 'सामनावीर' म्हणून गौरविण्यात आले.

दोन्ही संघांचे 'सारथी' ठरले अरविंद रायबोले

या संपूर्ण स्पर्धेचे मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी केवळ मैदानाबाहेरूनच नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानावर उतरून दोन्ही संघांच्या बाजूने खेळ केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा असा सक्रिय सहभाग पाहून दोन्ही संघांतील कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते.

या सामन्यांत अहमदपूरकडून पिएसआय आनंद श्रीमंगल, रवि बुरकुले, तानाजी आरदवाड, सुकेश केंद्रे, मारोती शिंदे, सुग्रीव मुंढे, साबळे, पाकलवाड, विशाल, हरी कांबळवाड यांनी खेळ उंचावला. तर किनगाव संघाकडून सहायक पोलीस निरीक्षक डोके , किशोर सोनवणे, सुनील श्रीरामे, शिवाजी गोरे, स्वप्निल कांबळे,संदीप मुसळे, देवानंद दहीफळे, प्रताप गायकवाड, बाळू कोंडमगीरे, सुरज कोतवाड, विष्णू मामडगे, गोपाळ कावळे व सुधाकर पोले यांनी योगदान दिले. सामन्यांचे पंच म्हणून बाळू किनकर यांनी चोख कामगिरी बजावली.

या उपक्रमामुळे पोलीस दलातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, सर्व स्तरांतून या आयोजनाचे कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande