अहमदपूर बायपासवर कत्तलीसाठी नेले जाणारे ८ बैल वाचवले
लातूर, 22 मार्च (हिं.स.)। अहमदपूर पोलिसांनी अवैध प्राणी वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने नेले जाणारे ८ गोवंश जातीचे बैल वाचवले आहेत. ही कारवाई नांदेड ते शिरूर जाणाऱ्या बायपास रोडवरील तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे करण्यात आली
पोलीस कारवाई


लातूर, 22 मार्च (हिं.स.)।

अहमदपूर पोलिसांनी अवैध प्राणी वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने नेले जाणारे ८ गोवंश जातीचे बैल वाचवले आहेत. ही कारवाई नांदेड ते शिरूर जाणाऱ्या बायपास रोडवरील तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे करण्यात आली. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (जी), ११(१) (डी), ११(१)(ई) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (ए) (१), ५(२), ५ (बी), ९ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यकांत किशनराव आवराळे (वय ४०, रा. सय्यदपूर, ता. अहमदपूर) आणि कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील अंदुरावाडी तांडा येथील रहिवासी आकाश प्रभू राठोड (वय २५), पवन वैजनाथ राठोड (वय २१), आनंद लक्ष्मण राठोड (वय २५) व विकास मनोहर राठोड (वय २८) यांनी संगनमत करून एका लाल-करड्या रंगाच्या टाटा आयशर टेम्पोमध्ये (क्रमांक MH12 FC 8584) गोवंश जातीचे आठ बैल अत्यंत निर्दयपणे दाटीवाटीने कोंबले होते. हे प्राणी कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे नांदेड बायपास रोडने नेले जात असताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. या कारवाईत ४ लाख रुपये किमतीचे ८ बैल आणि ३ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस अंमलदार राम निवृत्ती रामोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार चिमंदरे हे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande