
रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत येथील कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे घेण्यात आलेल्या मराठमोळी दुचाकीस्वार या अनोख्या स्पर्धेत राजेश्वरी इंगवले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत दुचाकीवर दिमाखात सहभागी झालेल्या पाच महिलांनी हा मानाचा किताब पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
तज्ज्ञ परीक्षकांनी शोभायात्रेदरम्यान विजेत्यांची निवड केली. यात राजेश्वरी इंगवले, संध्या कोसुंबकर, राधा देवळे, राजश्री बंडबे आणि निकिता निवेंडकर यांची अनुक्रमे निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या पैठण्या अरिहंत ग्रुपचे मुकेश गुंदेचा यांच्यातर्फे प्रदान करण्यात आल्या.
हिंदू नववर्ष स्वागतयात्रा ही श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित केली जाते. कांचन डिजिटलचे फोटोग्राफर कांचन मालगुंडकर या यात्रेदरम्यान नेहमीच नावीन्यपूर्ण संकल्पना राबवतात. यंदाची मराठमोळी दुचाकीस्वार स्पर्धा ही त्याचाच एक भाग ठरली.
कार्यक्रमाला श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, नाना मराठे, कांचन मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, विश्वस्त विजय खेडेकर, नगरसेविका वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, दादा दळी, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण, अनिल पोटफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी