

रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : आंबव (ता. संगमेश्वर) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या ऑटो एक्स्पोला वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणामध्ये तंत्रज्ञानाधारित मॉडेल्स, विंटेज क्लासिक्स तसेच पॉवर-ट्यून केलेली परफॉर्मन्स वाहनांचे नेत्रदीपक प्रदर्शन आणि चित्तथरारक शोसारखे कार्यक्रम पार पडले. ऑटोमोबाइल अभियांत्रिकी क्षेत्रातील नावीन्य, तांत्रिक कौशल्य आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यांचे उत्कृष्ट दर्शन या प्रदर्शनातून घडले. प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या मॉडिफाइड कार्स व एअर सस्पेन्शन तंत्रज्ञान असलेल्या कार्स व बाइक्स विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सीइओ प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. अनिरुद्ध जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भगवत यांनी प्रास्ताविक केले.
प्रदर्शनात गोवा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग अशा विविध भागातून ५० पेक्षा अधिक कार व बाइक्स आल्या होत्या. त्यातील महिंद्रा थार, टोयोटा हायलक्स, मर्सिडीझ, एम जी कॉमेट आणि रॉयल एन्फिल्ड कॉंटिनेंटल जीटी ६५०, बेनेली ६०० आय, के टी एम ड्यूक ३९० यासारख्या ३० विशेष मॉडीफाइड कार्स व बाइक्स धारकांनी चित्तथरारक ड्रिफ्ट शो सादर केला. यावेळी मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन ड्रिफ्ट करण्याचे वाहन चालकांचे कौशल्य प्रत्यक्षात पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन तसेच उत्पादित केलेल्या अनेक पुरस्कारप्राप्त गो कार्ट व फॉर्म्युला कारदेखील प्रेक्षकांना यानिनित्ताने पाहता आल्या. या संघांनीही आपले तांत्रिक कौशल्य प्रभावीपणे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. वाहनप्रेमींसाठी हे प्रदर्शन एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरले.
उत्कृष्ट सहभागींना गौरविण्यात आले. याशिवाय सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दुर्गेश शेट्ये यांच्या बाइकला सर्वोत्तम मॉडिफाइड बाइक तर सूरज मटकऱ यांच्या कारला सर्वोत्तम मॉडिफाइड कार पुरस्कार पटकाविला.
कार्यक्रम समन्वयक म्हणून श्रवण करकरे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. भालचंद्र चव्हाण व श्रेयस बाणे यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिज्ञासा गोळे, अपेक्षा हेलोदे व समीक्षा पाटील यांनी केले. निखिल विचारे, प्रेम धनावडे, अश्वजित कांबळे, साईप्रसाद वरक, सानिका सापटे, सृजन शिरकर, जान्हवी मोरे, बिस्मा सोलकर, तन्वी पात्ये, ऋषिकेश बापट, सिद्धेश पाटील व इतर विद्यार्थी स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी