
जळगाव , 23 मार्च (हिं.स.) वरणगाव फॅक्टरी फाट्याजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशर मालवाहू गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.दिपनगरहून मुक्ताईनगरकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जात असताना आयशर गाडी (क्र. एमएच ४८ एजी २२६८) लाल माती परिसरात पोहोचताच वाहनातून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक शाहेद खान यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून स्वतः बाहेर पडत जीव वाचवला. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, वरणगाव नगर परिषदेचा अग्निशमन बंब तसेच आयुध निर्माणी वरणगावच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर