रत्नागिरी : डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण
रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दि. ४ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्ट
रत्नागिरी : डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण


रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दि. ४ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाची मूलभूत कौशल्ये आत्मसात व्हावीत व आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण व्हावे, यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात रोज सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल. शिबिरासाठी ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुले व मुली पात्र असतील.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत जिल्ह्यामध्ये जिम्नॅस्टिक या खेळाचे निःशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर होणार आहे. शिबिरात मुलांना फ्लोअर एक्झरसाइज, पोमेल हॉर्स, स्टील रिंग्स, टेबल वोल्ट, पॅरलल बार्स व हॉरिझाँटल बार तर मुलींना फ्लोअर एक्झरसाइज, टेबल वोल्ट, बॅलनसिंग बिम या उपकरणाची तसेच त्यावरील मूलभूत कौशल्याची ओळख या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे.

जिम्नॅस्टिक्सचा मराठीत अर्थ 'शारीरिक कसरती' किंवा 'व्यायामविद्या' असा होतो. हा एक असा क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये शक्ती, चपळता, समन्वय आणि संतुलन सुधारण्यासाठी विविध क्रीडा उपकरणांचा वापर करून किंवा त्याशिवाय पद्धतशीर शारीरिक हालचाली आणि कसरत केली जाते. जिम्नॅस्टिक्स शरीराची ताकद, लवचिकता, समतोल, चपळता आणि सहनशक्ती वाढवणारा एक पद्धतशीर व्यायाम प्रकार आहे. जिम्नॅस्टिक्स हा खेळ हा सर्व खेळांचा पाया मानला जातो. त्यामुळे स्नायू बळकट होतात, मानसिक एकाग्रता वाढते आणि शरीर सुडौल राहते. नियमित जिम्नॅस्टिक्समुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते. जिम्नॅस्टिकमधील हालचाली हात, पाय, खांदे, पाठ, छाती आणि पोटाच्या स्नायूंच्या गटांच्या विकासास हातभार लावतात. कलात्मक जिम्नॅस्टिक्स हा ऑलिम्पिक स्पर्धेतील नेहमीच सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक आहे.

जिम्नॅस्टिक्स उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी सचिन मांडवकर (८४०८८६५८७०) यांच्याशी संपर्क साधण्याचे व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande