
चंद्रपूर, 23 मार्च (हिं.स.)।
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या वेळेत सोडविण्याच्या उद्देशाने आज २३ मार्च रोजी स्थायी समिती सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीस महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव तसेच आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थित होते. यावेळी विविध प्रभागांतील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महापौर संगीता खांडेकर यांनी बोलाविलेल्या या विशेष बैठकीस नगरसेवक राहुल पावडे, नंदु नागरकर, रवी लोणकर तसेच माजी नगरसेवक राजीव कक्कड, अजय सरकार तसेच संतोष अतकरे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तुकूम येथील नाला बांधकामासाठी सिटीपीएस, रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासन यांची संयुक्त बैठक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी कंत्राटदारांनी थकीत देयके, वर्क ऑर्डर्स मिळूनही कामांना सुरुवात न होणे तसेच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही वर्क ऑर्डर्स न मिळण्याबाबतच्या मागण्या मांडल्या. यावर आयुक्तांनी मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवांची देयके प्राधान्याने व उर्वरित देयके थकीत कालावधीनुसार अदा केली जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच वर्क ऑर्डर्स मिळालेल्या कामांना तात्काळ सुरुवात करण्याचे व टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे वर्क ऑर्डर्स लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव यांनी कंत्राटदारांनी कामाचा दर्जा उत्तम ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, गुणवत्तापूर्वक कामे न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
गौतम नगर व महाकाली कॉलरी जोडणाऱ्या पुलाजवळ नाली बांधकाम, महाकाली मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, रघताटे ले-आऊट येथील रस्ता व नाली बांधकाम यांसारख्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मनपा क्षेत्रात इतर विभागांच्या विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात होणारा विलंब कमी करण्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश महापौर व आयुक्तांनी दिले.
नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव