
‘एटीआर’ न सादर करणाऱ्यांची संख्या मोठी
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी तब्बल सुमारे सात हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. विद्यापीठात एकूण १६० हून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, त्यापैकी ७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापक भरतीसाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली. मात्र, अर्जासोबत आवश्यक असलेला ‘एटीआर’ (Academic Performance Record) न भरलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील सुमारे दोन हजार उमेदवारांनी अद्याप ‘एटीआर’ सादर केले नसल्याचे समोर आले आहे.भरती प्रक्रियेसाठी ६०:२०:२० असे गुणांचे प्रमाण निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये शैक्षणिक कामगिरी, अध्यापन कौशल्ये आणि मुलाखत यांचा समावेश आहे. उमेदवारांसाठी ‘एटीआर’ सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ही भरती मुख्य परिसरासह धाराशिव उपपरिसरातील पदांसाठी राबवली जात आहे. मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या चारही विद्याशाखांतील पदांचा समावेश आहे. त्यामध्ये प्राध्यापकांच्या ८, सहयोगी प्राध्यापकांच्या १२ आणि सहायक प्राध्यापकांच्या ५३ पदांचा समावेश आहे.विद्यापीठाने २ एप्रिल २०२५ रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. एप्रिल-मे महिन्यांत ४,६६३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर दोन वेळा अर्ज दुरुस्ती, अपग्रेडेशन आणि नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात आली. नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने सुधारित कार्यपद्धती जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करून आवश्यक बदल केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis