
पुणे, 23 मार्च (हिं.स.)। पुणे रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, सुमारे 25 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसी अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. पुण्याच्या रिंगरोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात शासनाकडून देखील वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, भविष्यात पुण्याच्या वाहतूकव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर रिंगरोड प्रकल्पामुळे शहराबाहेरील वाहतूक थेट वळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल.
या रिंगरोडमुळे पुणे जिल्ह्यातील विविध तालुके तसेच औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहेत. विशेषतः मुंबई-बंगळुरू महामार्ग, नगर रोड, सोलापूर रोड यांसारख्या प्रमुख मार्गांना जोडणारी ही रिंगरोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासीवाहतूक दोन्हीमध्ये वेळेची बचत होणार आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी प्रशासनाने गती वाढवली असून, येत्या काही वर्षांत संपूर्ण रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूणच, पुणे रिंगरोड हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु