
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, भीषण गारपीट आणि सतत बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादक पट्ट्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन नलावडे आणि इतर शेतकरी उपस्थित होते. त्यांनी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.यंदा हवामानातील तीव्र बदलांमुळे राज्यातील अनेक आंबा उत्पादक भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर उशिरा आला, त्यानंतर अचानक वाढलेल्या थंडीमुळे तो मोठ्या प्रमाणावर करपून गेला. यानंतर अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यामुळे फळधारणा अत्यंत कमी झाली आहे.
या परिस्थितीत हजारो शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आंबा हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असल्याने हजारो कुटुंबांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. मात्र, हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादक सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत.दरम्यान, प्रभावित शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड