
सोलापूर, 23 मार्च (हिं.स.) : करमाळा तालुक्यातील स्वयंअर्थसहाय्यित खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर गैरप्रकार समोर आला आहे. अनधिकृत व खासगी वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक केली जात असल्याचा प्रकार शिक्षक भारती संघटनेने उघडकीस आणला.
या संदर्भात करण्यात आलेल्या लेखी तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांच्या वायुवेग पथकाने तातडीने कारवाई करत धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.1 फेब्रुवारी 2026 ते 19 मार्च 2026 या कालावधीत करमाळा तालुक्यात एकूण 288 वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 71 वाहने दोषी आढळली. संबंधित वाहनचालक आणि संस्थांकडून एकूण 1 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा बेकायदेशीर वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड