अमरावतीत गॅस व इंधन टंचाई; पुरवठा सुरळीत करण्याची रवि राणांची मागणी
अमरावती, 24 मार्च, (हिं.स.) - शहरात गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच जिल्हा पुरवठा अधिक
अमरावतीत गॅस व इंधन टंचाई; पुरवठा सुरळीत करा - आ. रवि राणांची मागणी


अमरावती, 24 मार्च, (हिं.स.) - शहरात गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. लांडे, अमरावती यांना निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनानुसार, मागील दोन दिवसांत शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा करण्यात आला असता गॅस व इंधन पुरवठा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्या. गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी महिलांना लहान मुलांसह दीर्घ रांगेत उभे राहावे लागत असून, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वितरण व्यवस्थेत असमतोल व नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागत असून, इंधन भरण्याच्या वेळी ग्राहकांमध्ये वाद व गोंधळ निर्माण होत असल्याचे निरीक्षणात आले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर वितरणासाठी अतिरिक्त केंद्रे सुरू करणे, वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून नागरिकांना पूर्वकल्पना देणे, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी संबंधित वितरकांशी समन्वय साधणे, अशा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच पेट्रोल पंपांवर शिस्तबद्ध रांग व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच इंधन पुरवठा नियमित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वरील उपाययोजनांची अंमलबजावणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा, असे निर्देश आमदार रवी राणा, अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती, विधानभवन यांनी दिले असून, अधिक समन्वयासाठी त्यांचे खाजगी सचिव उमेश ढोणे मोबाईल ९०४९०६७३३१ वर यांच्याशी संपर्क साधण्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सदर विषय अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही आमदार राणा यांनी नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande