
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : भाजपचे पदवीधर संघाचे आमदार निरंजन डावखरे व त्यांच्या पत्नी नीलिमा डावखरे यांच्या पुढाकारातून आज रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांना शालेय उपयोगी संगणक संचांचे वाटप करण्यात आले.
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील शाळांना संगणक देण्यात आले. त्यांचे वितरण सौ. नीलिमा डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे आणि ते डिजिटल युगात सक्षम व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी