
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। शहीद दिनानिमित्त अलिबाग शहरात देशभक्तीपर वातावरणात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, रायगड-अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही पदयात्रा उत्साहात पार पडली.
भारतामध्ये दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या थोर क्रांतिकारकांना लाहोर तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली होती. त्यांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या पदयात्रेचे प्रमुख मार्गदर्शन जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले, तर राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी “भारत माता की जय”, “शहीद जवान अमर रहे”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तसेच स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, अकॅडमीचे युवक-युवती आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ झाली असून शहीदांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)