
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। सरकार तर्फे एकीकडे ‘हर घर नल, हर घर जल’च्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा या गावातील दलित वस्तीत गेल्या २५ दिवसांपासून थेंबभर पाणी आलेले नाही. भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांना शेजारच्या तलावातून दूषित पाणी आणून तहान भागवावी लागत असल्याने आता या भागात संतापाची लाट उसळली आहे.
सध्या उन्हाचा पारा वाढला आहे आणि त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढत आहे अशात पुंडा गावातील दलित वस्तीत गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. गावाचा विस्तार मोठा असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अत्यंत कमी वेळ पाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यातच वस्तीच्या भागात पाण्याचा दाब नसल्यामुळे नळांपर्यंत पाणी पोहोचतच नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पाणी नसल्यामुळे महिलांना, लहान मुलांना आणि वृद्धांना डोक्यावर हंडे घेऊन शेजारच्या तलावाकडे जावे लागत आहे. मात्र तलावातील पाणी अत्यंत दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. वस्तीत साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दलित वस्तीच नव्हे तर गावातील अनेक गल्ल्यांमध्ये पाण्याचा प्रेशर नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने संपूर्ण गावात पाण्याचा हाहाकार निर्माण झाला आहे.आता तरी संबंधित विभागाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या दलित वस्तीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे