
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून 6 पैकी 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आज गटनेता बदलण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी नोटीस शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून बजावण्यात आली आहे.मात्र यावर उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेता विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पत्रात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
i) नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील आणि सागर भारूका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे.
ii) त्याचप्रमाणे सोनाली सरोदे यांनी देखील मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्ष किंवा गटात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे.
iii) या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो आणि गटनेता बदलाचा निर्णय होतो का, याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे