भोंदूबाबांच्या नावांची यादी पोलिसांना देणार; अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला निर्णय
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। राज्यात उघडकीस येत असलेल्या भोंदूगिरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अधिक आक्रमक झाली असून, खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी पोलिसांना देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. अं
भोंदूबाबांच्या नावांची यादी पोलिसांना देणार; अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला निर्णय


नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। राज्यात उघडकीस येत असलेल्या भोंदूगिरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अधिक आक्रमक झाली असून, खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी पोलिसांना देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. अंनिस'चे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख भोंदूबाबांच्या नावांची यादी व उपलब्ध पुरावे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सुपूर्द करणार आहेत.

दरम्यान, 'अंनिस'च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी सदानंद दाते यांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवण्याची मागणी त्यांनी केली. या कक्षांमध्ये पत्रकार, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून नियमित बैठका घेतल्यास अघोरी प्रकारांना वेळीच आळा बसू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. 'अंनिस'कडून भोंदूबाबांविरोधात तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे, असे समितीने सांगितले आहे.

महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मंजूर होऊन दशक उलटूनही त्याचे नियम अद्याप तयार न झाल्याबद्दल 'अंनिस'ने नाराजी व्यक्त केली. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्पष्ट नियमावली तयार करून पोलिसांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढत असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरजही समितीने अधोरेखित केली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती 'अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande