
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव येत्या शनिवारपासून (दि. २८ मार्च) सुरू होत असून, तो दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे.
नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा चौदावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील सौ. विलासिनी आणि श्री. विलास मनोहर तांबे आणि कुटुंबीय करणार आहेत.
धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. तीन एप्रिलला पहाटे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.
पहिल्या दिवशी, २८ मार्च (शनिवार) रोजी दुपारी तीन वाजल्यापासून श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत स्थानिक कलाकार गायनसेवा करणार असून, रात्री साडेदहा वाजल्यापासून स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. २९ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत २९ मार्चला सौरयाग, ३० मार्चला रुद्र स्वाहाकार, ३१ मार्चला गणेशयाग/नवचंडी, एक एप्रिलला विष्णुयाग, तर दोन एप्रिलला दत्तयाग होणार आहे.
२९ मार्च ते एक एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत पुण्यातील हभप मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची कीर्तने होणार असून, तीन एप्रिलला पहाटे चार वाजता हभप अमेयबुवा गुण्ये रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी साडेसातनंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. २९ मार्चला सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेत मंत्रजागर केला जाणार आहे. ३१ मार्चला सायंकाळी पाच ते सात या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
दोन एप्रिलला रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत अजिंक्य पोंक्षे यांचा संगीतरजनी हा कार्यक्रम होणार आहे. अभंग, भक्तिगीते आणि नाट्यगीतांच्या या मैफलीला सुशील गद्रे (हार्मोनियम), विश्वास (राजू) जोशी (तबला) आणि कैलास दामले (पखवाज) यांची साथसंगत लाभणार आहे. हेच कलाकार कीर्तनालाही साथसंगत करणार आहेत.
उत्सवकाळात याग करण्यासंदर्भात अभय देवस्थळी (9421188139) आणि दीपक भाट्ये (9423875453) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, श्रींची पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567, 9028745038) किंवा उमेश आंबर्डेकर (9423292437) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी केले आहे. सध्या भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी भाविकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी