
जळगाव, 24 मार्च (हिं.स.) दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका तरुणाला नशिराबाद पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. चेतन सूर्यभान पाटील ( वय 18, रा. वरची अळी, नशिराबाद) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्याकडून गावठी कट्टासह डमी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते.
त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रात्री सुमारे ८.२० वाजता आरोपी चेतन पाटीलला पकडले. तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा तसेच एक डमी गावठी कट्टा जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर