
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एन.पी. कॉलेज, वेश्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशन जावळे उपस्थित होते. तसेच चित्रलेखा पाटील (कार्यवाह, पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटी), अमित पुंडे (जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत), राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी, सुचिता साळवी, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, यतीराज पाटील, पंच पुरुषोत्तम पिंगळे, नंदकुमार वरसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात क्रीडेला जीवनात महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगत युवकांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहन केले. चित्रलेखा पाटील यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत अधिकाधिक युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी संस्थेकडून सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपली कौशल्ये दाखवली. गोळाफेक, धावणे, कबड्डी व खो-खो या स्पर्धांमध्ये विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे ठरले :
गोळाफेक (मुले) – स्वराज उमेश शिंदे (प्रथम), मीत राजन राऊत (द्वितीय), भावेश मनोज भगत (तृतीय)
गोळाफेक (मुली) – कीर्ती संजय कडवे (प्रथम), हर्षाली अभय गावंड (द्वितीय), साक्षी शशिकांत पाटील (तृतीय)
४०० मीटर धावणे (मुले) – यश दत्ताराम म्हात्रे (प्रथम), सुशांत रवींद्र मढवी (द्वितीय), अक्षय राजा लेंडी (तृतीय)
४०० मीटर धावणे (मुली) – साक्षी जयेंद्र शिंदे (प्रथम), आशिष निलेश पाटील (द्वितीय), अक्षता महेंद्र वार्डे (तृतीय)
कबड्डी (मुले) – विभागीय स्पोर्ट्स खारेपाट (प्रथम), जय हनुमान मंडळ, मुरुड (द्वितीय) खो-खो (मुली) – प्रिझम सामाजिक विकास संस्था (प्रथम), कुलाबा क्रीडा प्रबोधनी, अलिबाग (द्वितीय)स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तपस्वी गोंधळी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)