थॉमस कपसाठी लक्ष्य सेनकडे नेतृत्व, तर उबर कपसाठी पीव्ही सिंधूकडे धुरा
नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.)ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन पुढील महिन्यात होणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करेल, तर माजी विश्वविजेती पीव्ही सिंधू आणि उदयोन्मुख बॅडमिंटनपटू उन्नती हुडा उबर कपमध्ये भारताच्या आव्हानाचे न
लक्ष्य सेन


पी व्ही सिंधू


नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.)ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन पुढील महिन्यात होणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करेल, तर माजी विश्वविजेती पीव्ही सिंधू आणि उदयोन्मुख बॅडमिंटनपटू उन्नती हुडा उबर कपमध्ये भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करतील.

भारतीय बॅडमिंटन संघटनेने २०२२ च्या थॉमस कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या संघातील बहुतांशी बॅडमिंनपटूंना कायम ठेवले आहे. डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि पुरुष दुहेरीतील सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला कायम ठेवण्यात आले आहे. युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीला वरिष्ठ स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले आहे. पुरुष संघात २०२२ च्या विजेत्या संघाचा सदस्य एम. आर. अर्जुन याचेही पुनरागमन झाले आहे. तो दुखापतीतून सावरला असून, नवोदित हरिहरन अमासकरुणनसोबत दुहेरी संघात समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या दुहेरी संघाचा सदस्य असलेला ध्रुव कपिला देखील संघाचा भाग आहे, तर किरण जॉर्ज एकेरीमध्ये संघाला अतिरिक्त बळ देईल.

उबर कपमध्ये, २०१९ ची विश्वविजेती सिंधू, अव्वल दुहेरी जोडी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांच्यासोबत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करेल. भारतीय संघाने गेल्या वेळी उपांत्य फेरी गाठली होती आणि यावेळी त्या कामगिरीत सुधारणा करण्याचे त्यांचे ध्येय असेल. उन्नती हुडासोबत देविका सिहाग, इशारानी बरुआ आणि किशोरवयीन तन्वी शर्मा यांसारख्या तरुण प्रतिभावान बॅडमिंंटनपटूंचा समावेश आहे.

थॉमस कपसाठी भारतीय पुरुष संघ: लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, किरण जॉर्ज, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, हरिहरन अंस्कारुनन, एमआर अर्जुन, ध्रुव कपिला.

उबर कपसाठी भारतीय महिला संघ : पीव्ही सिंधू, उन्नती हुडा, तन्वी शर्मा, देविका सिहाग, इशरानी बरुआ, त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, कविप्रिया सेल्वम, सिमरन सिंघी, तनिषा क्रास्टो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande