
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्रातील टियर-२आणि टियर-३ शहरांसाठी 'पीएम ई-बस सेवा' योजनेअंतर्गत अधिकाधिक इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी संसदेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात या योजनेवर चर्चा होत असताना त्यांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार इलेक्ट्रिक बसचे वितरण करण्यात येणार असल्याच्या घोषणेचे स्वागत करत या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लहान शहरांनाही मोठ्या प्रमाणावर मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे नागरिकांना माफक दरात
पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. मोठ्या महापालिकांकडे आर्थिक स्रोत मुबलक असल्याने त्यांना बससेवा प्रभावीपणे राबवणे शक्य होते. मात्र, लहान महापालिकांना आर्थिक मर्यादांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की, जास्तीत जास्त शहरांचा या योजनेत समावेश करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्याचे निकष अद्याप निश्चित झाले नाही. अंतिम निकष ठरल्यानंतर राज्य सरकारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत केंद्र सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १६ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झालेल्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०२७ पर्यंत देशातील ११६ शहरांमध्ये १० हजार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार बसचे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही खट्टर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis